‘काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करण्यासाठीच पहलगामचा हल्ला’   

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांबद्दल तीव्र दुःख आणि वेदना होत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. प्रत्येक भारतीयांना पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती आहे. तो कोणत्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारा असो, या हल्ल्यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या वेदना होत आहेत. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे, म्हणूनच त्यांनी पहलगावर हल्ला केला, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केले.  
 
मोदी म्हणाले, दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाने एकत्रित होऊन लढणे गरजेचे आहे. आपली १४० कोटी भारतीयांची एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प मजबूत करावा लागेल. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल. आज सर्व जग भारताकडे पाहत आहे, या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एकजूट झाला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

संपूर्ण जग पाठीशी 

भारतीय नागरिकांमध्ये जो राग आहे तो जगभर आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिलीत संदेश पाठवले आहेत. या भयानक दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. 
 
दहशतवाद्यांविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणार्‍यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
 

Related Articles